چھوٹے بچوں کے لیے مراٹھی کی کہانیاں
आई ती आईच
मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?' हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, 'ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.'
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, 'महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं. महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?' त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, 'हे बालक या बाईचंच आहे. 'त्याला कापण्यात यावं, 'असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.'
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
चतूर न्यायमुर्ती
एका गृहस्थाने आपली विहिर शेजार्याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.'या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला.
न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या मालकाला बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजार्याला विकलीस हे खरे आहे काय?'
जुना मालक : होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झालयं त्यात मी माझी फक्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजार्याचा बिलकूल हक्क नाही.
न्यायमुर्ती : तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
जुना मालक : (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना? वाटणारच. पण असं असुनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !
न्यायमुर्ती : ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहिर विकून टाकली असतानाही, ज्या अर्थी तिचा वापर तू आतलं तुझ्या मालकीच पाणी ठेवण्यासाठी करीत आहेस, त्या अर्थी ती विहीर त्याला विकल्यामूळे, ते तू त्या विहिरीचा अशा तर्हेनं वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजार्याला दिले पाहिजेस.'
न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजार्याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.
हंस कोणाचा ?
भगवान गौतमबुध्दांच्या बालपणीची गोष्ट. दहा अकरा वर्षाचं वय होतं त्या वेळी त्यांचं आणि ते तेव्हा त्यांच्या मूळ 'सिध्दार्थ' या नावानंच ओळखले जात होते.एकदा छोटा सिध्दार्थ आपल्या मित्रासह राजोद्यानात बोलत बसला असता-बाण लागल्यामुळे रक्तबंबाळ झालेला एक हंस कसाबसा उडत त्याच्या पुढ्यात येऊन पडला. सिध्दार्थने त्याला उचलले, जवळच्या पुष्करणीपाशी नेऊन पाणी पाजलं, आणि थोडा वेळ प्रेमानं कुरवाळलं. नतंर त्यानं त्याची जखम धुवून तिच्यावर कसली तरी औषधी वनस्पती लावली. एवढं झाल्यावर त्या हंसाला थोडं बरं वाटू लागलं.
तेवढ्यात सिध्दार्थचा अंदाजे त्याच्याच वयाचा चुलतभाऊ देवदत्त तेथे आला व म्हणाला, 'सिध्दार्था, या हंसाला बाण मारुन मी घायाळ केले असल्याने, हा माझा आहे, तेव्हा त्याला माझ्या स्वाधीन कर.'सिध्दार्थ म्हणाला, 'देवदत्ता, एखाद्याच्या जिवावर उठलेल्या माणसापेक्षा, त्याच्या जिवाचं रक्षण करणाऱ्याचाच त्याच्यावर खरा अधिकार असतो. तू या हंसाच्या जिवावर उठला होतास, पण मी याला वाचवला, तेव्हा हा हंस आता माझाच आहे..'
अखेर देवदत्त हा सिध्दार्थच्या वडिलांकडे गेला व त्याने त्यांच्याकडे सिध्दार्था विरुध्द तक्रार केली. महाराजांनी सिध्दार्थाला बोलावून घेतलं व त्याचं म्हणणंही ऎकून घेतलं. त्यानंतर ते सिध्दार्थला म्हणाले, बाळ ! एकून धर्मशास्त्राच्या दृष्टीनं विचार करता, या हंसाचं रक्षण तू केलसं म्हणून हा हंस तुझा आहे हे खरं असलं, तरी क्षात्रधर्माचा विचार करता, एखाद्या क्षत्रियानं एखाद्या प्राण्याची शिकार केली, की तो प्राणी पुर्ण मेलेला असो वा अर्धवट मेलेला असो, तो त्या क्षत्रियाच्याच मालकीचा होता. या हंसाला देवदत्तानं घायाळ केलं असल्याने हा त्याचाच ठरतो.'
यावर तीक्ष्ण बुध्दीचा सिध्दार्थ वडिलांना म्हणाला, 'महाराज ! क्षात्रधर्माच्या दृष्टीनं विचार केला, तरी हा हंस माझ्याजवळच राहू देणे इष्ट ठरते. देवदत्तानं या हंसाला बाणानं अर्धवट मारला असता ज्या अर्थी हा माझ्या पायाशी येऊन पडला, त्या अर्थी या शरणागताला अभय देऊन याचं रक्षण करणं हे क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्या नाही काय ?'बाल सिध्दार्थाच्या या असामान्य बुध्दीतेजानं थक्क झालेले त्याचे वडील म्हणाले, खरं सांगायचं, तर हा हंस नक्की कुणाचा, हे मलाच कळेनासं झालं आहे. तेव्हा आपण हे प्रकरण आपल्या राज्याच्या न्यायमुर्तीकडे नेऊ.'
न्यायमुर्तीकडे हे प्रकरण जाताच त्यांनी त्या हंसाला एका सेवकाला दिले, आणि तिथून परस्परविरुध्द दिशांना समान अंतरावर देवदत्त व सिध्दार्थ यांना बसायला सांगून, त्या दोघांनाही त्या हंसाला आपल्याकडे बोलवायला सांगितले. प्रथम देवदत्तानं टाळी वाजवून 'ये,ये,' म्हणत हात हालवून त्या हंसाला आपल्याकडे बोलावलं, पण त्या हंसानं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. त्यानंतर सिध्दार्थानं त्या हंसाला एकदाच 'ये' म्हणताच, तो जखमी हंस मोठया कष्टानं उडत उडत त्याच्याकडे गेला व त्याला बिलगून बसला !तो प्रकार पाहून न्यायमुर्ती म्हणाले, हंस कुणाचा या प्रश्नाचं उत्तर आता प्रत्यक्ष या हंसानंच दिलं असल्यानं, मी वेगळा निर्णय देण्याचा प्रश्न उरत नाही.'
No comments:
Post a Comment